गुड न्यूज! पीएमपीच्या ताफ्यात येणार आलिशान ‘डबल डेकर’ बस
पुणे- डबलडेकर बस खरेदी करण्याच्या पीएमपीच्या प्रक्रियेला अखेर दीड वर्षाच्या कालावधीनंतर मुहूर्त मिळाला असून पुढील आठवड्यापासून निविदाप्रक्रिया सुरू होईल. २० डबलडेकरसह १०० ई-बसची खरेदी करण्यात येईल,असे समजते.
डिसेंबर २०२२ मध्ये ओमप्रकाश बकोरिया अध्यक्ष असताना बसखरेदीचा निर्णय झाला होता. त्यास संचालक मंडळाने देखील मंजुरीही दिली होती. मात्र त्यानंतर सारे ठप्प झाले. बस प्रत्यक्ष धावण्यासाठी आणखी किमान सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. पुणे शहरात मागील काही वर्षांपासून होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन डबलडेकर बस सेवा सुरु करायचा निर्णय झाला होता. पहिल्या टप्यात २० बस घेतल्या जातील. या बस ‘बीआरटी’ मार्गावरून धावणार नाहीत.
प्रति किमीसाठी सहा रुपये लागणार
इलेक्ट्रिक बस एक किलोमीटर धावण्यासाठी अवघे सहा रुपये खर्च येतो. मात्र ठेकेदाराच्या बसला प्रतिकिमीसाठी ५० ते ६० रुपये द्यावे लागतात. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने स्वतः मालकीच्या बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. यासाठी पीएमपी बँकांकडून कर्ज घेणार आहे. याशिवाय पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमआरडीए यांच्याकडूनही आर्थिक साहाय्यही घेण्यात येईल.
पीएमपी स्वःताच्या मालकीच्या एकूण १०० इलेक्ट्रिक बस घेणार असून यात २०डबलडेकर असतील. पुढील आठवड्यापासून निविदा प्रक्रियेला सुरवात होणार असून या प्रक्रियेसाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे पीएमपीएमएलचे सह व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी म्हटले आहे.