महाराष्ट्रातील वैचारिक दारिद्र्यामुळे परिस्थिती चिंताजनक…!

पुणे : मतांचे ध्रुवीकरण करून केवळ राजकीय पोळी भाजून घेण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रच्या विकासाला तिलांजली दिली जात असून महाराष्ट्रात वैचारिक दारिद्रय वाढत असून ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे मत ज्येष्ठ लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख (Lakshmikant Deshmukh) यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यशवंतराव दाते स्मृती संस्था आणि भोळे व सुमंत परिवाराच्या संयुक्त विद्यमाने डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, विजया भोळे, माधुरी सुमंत, यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, पुरस्कार समिती सदस्य किशोर बेडकीहाळ आदी उपस्थित होते.
वर्ष २०२४ च्या डॉ. भा. ल. भोळे स्मृती वैचारिक ग्रंथ पुरस्कारासाठी (Award) सोलापूर (Solapur) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सरफराज अहमद यांच्या ‘राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान’ या ग्रंथाची तर, डॉ. भा. ल. भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुरखेडा, गडचिरोली येथील शुभदा देशमुख यांची निवड करण्यात आली होती. डॉ.यशवंत सुमंत स्मृती जीवनगौरव पुरस्काराने कोल्हापूर येथील ज्येष्ठ संशोधक डॉ. सुनीलकुमार लवटे यांना, तसेच डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधक प्रेरणा पुरस्कारासाठी शेती प्रश्नांचे अभ्यासक-संशोधक पुण्यातील डॉ. सोमिनाथ घोळवे यांना गौरविण्यात आले . यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, पूर्वी विद्वत्ता, सदवर्तन आणि चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष होते. आता माणसाची प्रतिष्ठा जवळ असलेल्या संपत्तीवरून ठरते. समाजाच्या नैतिक आणि भौतिक जीवनातील दरी रुंदावत चालली आहे. वाढत्या चंगळवादामुळे समाज आत्ममग्न झाला आहे. जातीपातीच्या राजकारणाने सामाजिक (Social) वीण उसवत चालली आहे. समाज म्हणजे माणसांची साखळी असे चित्र अभिप्रेत असताना जाती धर्मात विभागलेल्या माणसांच्या झुंडी असे चित्र तयार झाले आहे.माणसांना माणसांचीच भीती वाटावे, असे वातावरण आपणच तयार केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी केले, तर पुरस्कार समिती सदस्य किशोर बेडकीहाळ यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. रंजना दाते यांनी मानपत्र वाचन आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले