डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठात पर्यटन विषयक अभ्यासक्रम

पुणे : करोनाच्या प्रदीर्घ काळानंतर पर्यटन पुन्हा एकदा वेग धरू लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी आणि वीणा वर्ल्डच्या सहयोगाने प्रवास आणि पर्यटन प्रशस्तिपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. सहा महिन्याचा हा अभ्यासक्रम असून २१ ते ३० ही त्याची वयोमार्यादा आहे. २ सत्रामध्ये हा अभ्यासक्रम असून दुसर्या सत्रामध्ये प्रात्याक्षिक अनुभव घेण्यासाठी वीणा वर्ल्डमध्ये संधी मिळणार आहे. हा अभ्यासक्रम प्रत्यक्ष क्षेत्राशी निगडीत असून रोजगार निर्माणसाठी पूर्ण सहाय्यता वीणा वर्ल्ड आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्याकडून मिळणार आहे.
अभ्यासक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी वीणा वर्ल्ड च्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालिका वीणा पाटील, सुनिला पाटील, डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी चे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ मिलिंद पेशवे उपस्थित होते. अभ्यासक्रम समन्वयक अस्मिता पाटील यांनी आभार मानले तर देविका मुतालिक यांनी सुत्रसंचालन केले.वीणा पाटील म्हणाल्या, पर्यटनामुळे जगभर प्रवास करता येतो आणि खूप मोठा रोजगार सुद्धा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होतो.
आपल्या “अतुल्य भारत” चे एक सन्माननीय नागरिक आणि प्रवासाचे उत्कट प्रवर्तक म्हणून, आपण लहान किंवा मोठ्या मार्गाने पर्यटनाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत सहभागी होणे आवश्यक आहे. एक प्रवासी आठ लोकांसाठी रोजगार निर्माण करतो. महामारी आधी पर्यटन क्षेत्र हे दुसर्या क्रमाकांचं मोठं क्षेत्र होतं. प्रवास आणि पर्यटनाला मरण नाही. त्यामुळे हे क्षेत्र पुन्हा नव्याने उभं करण्याची जबाबदारी आपल्यावर आणि त्यानिमित्ताने अनेक रोजगार सुद्धा निर्माण होणार आहेत ही मला खात्री असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.