पुणे महापालिकेची ठिबक योजना सपशेल ‘फेल’; झाडे सोडून रस्त्यांवर पाणी
लाखो रुपयांचा चुराडा करुन रस्त्याच्या मध्यभागी तयार करण्यात आलेल्या गार्डनला पाणीच मिळत नसल्याने ही झाडे अक्षरश: वाळून गेली आहेत, धक्कादायक बाब म्हणजे त्यासाठी राबविण्यात आलेली ठिबक सिंचन योजना ‘ फेल’ ठरली आहे. या पाईपमधील पाणी झाडांना न जाता ते रस्त्यावर जात असून त्यामुळे रस्ते ओले तर झाडे कोरडी अशी हास्यास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे.
वारज्याकडून चांदणी चौकाकडे जाताना सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शोभेची झाडे व हिरवळ लावून यासाठी महापालिकेने ठिबक सिंचन प्रकल्पही तयार केला आहे. पण हे सिंचनाचे पाणी अनेकदा रस्त्यावर पडत असल्याने त्याचा फायदा झाडांना तुरळक प्रमाणात होतो. साहजिकच पुरेसे पाणी असतानाही पाण्याअभावी येथील झाडे वाळत आहेत. वारजे-माळवाडीतील माई मंगेशकर रुग्णालयासमोरील पुलाच्या दोन्ही बाजूंना महापालिकेकडून झाडे लावून हिरवळ करण्यात आली आहे. यामुळे हा परिसराचे सौंदर्य वाढले होते, मात्र मागील काही दिवसांपासून व्यवस्थित निगा न राखल्याने ही झाडे व हिरवळ सुकली आहे.
प्रशासन एका बाजूला ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे म्हणत असताना वारज्यातील या झाडांकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घुशी व उंदरांचा त्रास सुरू झाल्याने येथील जमीन पोकळ-भुसभुशीत झाली आहे. यामुळे या झाडांची मुळे कमकुवत झाल्याने ही झाडे धोकादायक झाली आहेत. यावर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.
या झाडांची व्यवस्थित निगा न राखल्याने पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हरित लवादाचा आदेश असतानाही या भागातील झाडांची काळजी घेत जात नाही. याला महापालिका उद्यान विभाग जबाबदार असल्याचा आरोप वारजेकरांनी केला आहे.