इंद्रायणीच्या पुरामुळे भक्ती सोपान पुलावरील लोखंडी संरक्षण कठडे पडले
इंद्रायणी नदी पात्रातील पाणी काही प्रमाणात ओसरले असून भक्ती सोपान पुलावरील पाणी कमी झाले आहे. दि.२५ रोजी च्या इंद्रायणी नदीच्या पुरामुळे जलपर्णी अडकून भक्ती सोपान पुलावरील काही लोखंडी संरक्षण कठडे पुलावरती व नदी पात्रात पडलेल्या अवस्थेत आहेत. तर काही वाहून गेले आहेत.
पुलावरती संरक्षणासाठी बसवण्यात आलेल्या काही लोखंडी पाईप (कठडे) यांना जलपर्णी अडकल्याचे दिसून येत आहे. जलपर्णी अडकलेल्या अवस्थेतच काही लोखंडी पाईप्स तिथे पडलेल्या दिसून येत आहे. हवेली घाटाच्या बाजूने घाटाच्या विद्युत प्रकाशाच्या सोयी सुविधे करीता असणारे विजेचे पोल पडलेल्या अवस्थेत आहेत. वैतागेश्वर मंदिराकडे (हवेली भाग ) जाणाऱ्या रस्त्याची पाण्याच्या प्रवाहाने दुरावस्था झालेली असून इंद्रायणी घाटाच्या प्रवेश द्वारा जवळच रस्त्यावर खड्डा पडलेला आहे.
तर (खेड भाग) इंद्रायणी घाटावर नदीपात्राच्या जवळ असणाऱ्या दुकानांमध्ये नदीपात्राचे पाणी घुसून धार्मिक पुस्तकांचे व लाकडी साहित्यांचे इतर वस्तूंचे नुकसान झाले आहे. सद्गुरु जोग महाराज यांच्या समाधी वरील असणारे छोट्या मंदिराचे बांधकाम पडले आहे. तसेच दुतर्फा घाटावरील काही दगडी छोटी (मंदिर)बांधकामे पडलेल्या अवस्थेत आहेत.