पीएमपीएमएल चालकांच्या कामबंद आंदोलनामुळे प्रवाशांचे झाले हाल
पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (दि. २९) पहाटेपासून काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे सकाळी तीन तास १४८ बस मार्गांवर धावल्याच नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. प्रलंबित मागण्या संचालक मंडळासमोर ठेवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर कृती समितीने संप मागे घेतला आणि सेवा सुरळीत सुरू झाली.
सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम विनाविलंब देण्यात यावी. सहा वर्षांपासून सेवेत असणाऱ्या बदली रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करण्यात यावे. तसेच कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नती देणे अशा तीन मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, याबाबत शिवसेनेचे प्रमोद भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा कृती समितीने आठ दिवसांपूर्वीच मागण्यांसह आंदोलनाचा इशारा पत्राद्वारे दिला होता. मात्र, प्रशासनाने पत्राची दखल घेतली नाही आणि पहाटे तीन वाजल्यापासून पीएमपीचे कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. यात हडपसरसह निगडी डेपोच्या सर्वाधिक बस बंद होत्या.
बससेवा बंद झाल्यास प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे पोलीस आयुक्तालय, स्वारगेट पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पीएमपी प्राशसनाला मागण्यांसह आंदोलनाबाबतचे पत्र दिले होते.
दरम्यान, रोजंदारी सेवकांना कायम करण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालक, सहव्यवस्थापकीय संचालक नितिन नार्वेकर यांना आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे उत्तर लेखी स्वरूपात दिले होते. तरीही कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यापासून वंचित ठेवलेले आहे. त्यामुळे आम्ही बेमुदत संपाचे हत्यार उपसले असे कृती समितीने सांगितले.
प्रलंबित मागण्यांसाठी पीएमपीच्या बसचालकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले होते. परंतु, या कृती समितीबरोबर बोलणे झाले आहे. पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचलाक मंडळासमोर सर्व मागण्या ठेवणार असल्याचे आश्वासन दिले.
त्यामुळे कृती समितीने बेमुदत काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. तसेच हडपसर डेपोसह सर्वच डेपोतील गाड्या नियमितपणे सुरु असून प्रवाशांना कोणताही त्रास नाही. – नितीन नार्वेकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल