ईडीची पुन्हा अॅक्शन, राष्ट्रवादीला टेंन्शन! शरद पवारांच्या निकटवर्तीयांवर मोठी कारवाई

मुंबई : (ED action against Praful Patel) मागीस दोन वर्षापासून ईडीनं राज्यातील विरोधकांवर धाडसत्र कायम सुरू ठेवलं आहे. त्यात आता मागील काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर असलेले शरद पवारांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने पटेल यांचं मुंबईतील राहतं घर जप्त केलं आहे. पटेल यांच्या इमारतीतील 2 मजले जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, पटेल यांच्या कुटूंबायांकडे 7 कोटी 44 लाखांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने आहेत. घरे, जमीन, व्यापारी जागा अशी 75 कोटींची स्थावर मालमत्ता प्रफुल्ल पटेल आणि 104 कोटी 56 लाखांची मालमत्ता पटेल यांच्या पत्नीच्या आणि 107 कोटींची स्थावर मालमत्ता एकत्रित कुटुंबाच्या नावावर आहे. यामधील किती मालमत्ता जप्त केली आहे. हे आद्याप समोर आलं नाही.
शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले प्रफुल्ल पटेल चार वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. तर सध्या राज्यसभा ते खासदार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी अनेक पदं भूषवली आहेत. पटेल यांच्या रुपानं राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा नेता हा आता ईडीच्या रडारवर आला आहे. याआधी ईडीने राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही कारवाई केली आहे आणि सध्या ते तुरुंगात आहेत.