रणबीर कपूरला ईडीची नोटीस; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
Ranbir Kapoor | बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) अडचणीत वाढ झाली आहे. रणबीर कपूरला ईडीकडून (ED) नोटीस पाठवण्यात आली आहे. तसंच त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. रणबीरला ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.
महादेव ऑनलाइन सट्टेबाजी (Mahadev Online Betting App) प्रकरणात अनेत बॉलिवूडचे कलाकार अडचणीत सापडले आहेत. यामध्ये बॉलिवूड कलाकारांसोबत काही प्रसिद्ध गायकांचा देखील समावेश आहे. महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणामुळे बॉलिवूडची स्टार मंडळी ईडीच्या रडारवर आहे. UAE मधील अॅपच्या सक्सेस पार्टीला जे सेलिब्रिटी उपस्थित होते त्या सगळ्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
तर यामध्ये आता रणबीर कपूरला ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली असून लवकरच त्याला चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
ईडीला महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या (Mahadev Online Betting App) माध्यमातून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत असल्याचा संशय होता. याप्रकरणी ईडीनं मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे ईडीकडून मुंबईसह कोलकाता, छत्तीसगड, रायपूर, भोपाळ अशा राज्यातील 39 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीमध्ये तब्बल 417 कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक बॉलिवूडकरांचा समावेश आहे. परदेशात महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या माध्यमातून काही इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. या इव्हेंटमध्ये बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींना बोलावण्यात आलं होतं. तसंच या इव्हेंटसाठी सेलिब्रिटींना मानधन रोख रकमेतून देण्यात आलं होतं. तसंच हे पैसे दोन नंबरचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.