पुणे मेट्रोचे विद्यार्थ्यांसाठी खास गिफ्ट! ‘एक पुणे विद्यार्थी पास’ आजपासून सुरु…
Pune Metro News | पुणे (Pune) मेट्रोने (Metro) विद्यार्थ्यांसाठी खास भेट दिली आहे. ‘एक पुणे विद्यार्थी पास’ (Ek Pune Vidyarthi Pass) या योजनेअंतर्गत महामेट्रोकडून विद्यार्थ्यांसाठी बहुउद्देशीय कार्डची सुरुवात होत आहे. पहिल्या 10 हजार जणांना हा पास मोफत दिले जाणार असून, या कार्डधारकांना तिकिटात 30 टक्के सवलत दिली जाईल. या पासची सेवा आजपासून सुरु होत आहे. पुणे मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रीपेड पासची सुविधा उपल्बध करून दिली, तर यासाठी पुणे मेट्रोने एचडीएफसी बॅंकेसोबत भागीदारी केली आहे.
या पासचा लाभ कोणाला घेता येईल ?
हा पास घेण्यासाठी किमान 3 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 13 ते 18 वर्षे वय असणारे विद्यार्थी पॅन कार्ड नसल्यास एक ई-फॉर्म भरून आपले एक पुणे विद्यर्थी पास कार्ड प्राप्त करू शकतात. हे कार्ड घेण्यासाठी महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक असेल. हे कार्ड घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तिकीटामध्ये 30 टक्के सवलत लागू असेल. या कार्डची वैधता 3 वर्षे असून, ते अहस्तांतरणीय आहे.
हा पास कसा मिळवायचा ?
या कार्डची रचना ‘एक पुणे कार्ड’ प्रमाणे आहे. पुणे मेट्रोच्या अधिकृत संकेत स्थळावर जावून ई- फॉर्म भरून पास प्राप्त करून शकतो. पहिल्या 10 हजार विद्यार्थ्यांना ‘एक पुणे विद्यार्थी पास’ कार्ड मोफत दिले जाणार आहे. त्यानंतर कार्डची किंमत 150 रुपये आणि वार्षिक शुल्क 75 रुपये असेल. या कार्डपासला दिवसातून 20 व्यवहाराची मर्यादा दिली आहे.
हा पास अजून कुठे वापरला जाऊ शकतो ?
मेट्रोच्या प्रवासाबरोबरच भारतात कुठेही रिटेल पेमेंटसाठी वापरले जाऊ शकते. एक पुणे विद्यर्थी पास देशातील नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) च्या नियमांचे पालन करते. त्यामुळे भारतातील इतर कोणत्याही मेट्रो आणि बस सेवांमध्ये वापरले जाऊ शकते. हे एक स्पर्श विरहित (कॉन्टॅक्टलेस) कार्ड आहे आणि त्यामुळे पेमेंट जलद होते. एक पुणे विद्यर्थी पास सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध असेल.