जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत रणकंदन; तरीही एकट्या पडलेल्या खडसेंना विजयाचा विश्वास!

जळगाव : (Eknath Khadse On Gulaprao Patil And Mahajan) जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ खडसे यांची कोंडी करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि काही आमदार मैदानात उतरल्याने एकनाथ खडसे एकटे पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र या सर्वांना आपण लढा देणार असून त्यात आपलाच विजय होईल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्ह्याचं राजकारण सध्या दूध संघाच्या निवडणुकीमुळे चांगलंच तापलं आहे. मागील सात वर्षाच्या काळापासून जळगाव दूध संघ एकनाथ खडसे समर्थकांच्या ताब्यात असल्याने त्यांच्या ताब्यातून दूध संघ घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे.
यामध्ये शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर त्यांच्या सोबतीला आघाडीच्या फळीत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण तर शिंदे गटाचे आ. चंद्रकांत पाटील हे खडसे यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत.
मुक्ताईनगर मतदार संघ हा एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला राहिला असल्याने या ठिकाणी त्यांना पराभूत करणे कठिण असल्याने याच बालेकिल्ल्यात खडसे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याची भूमिका त्यांच्या विरोधकांनी घेतली आहे. मागील काळात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत याची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं.