दहा दिवसांअखेर मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

मुंबई : (Eknath Shinde On Cabinet expansion) २० जुन नंतरच्या राजकीय घडामोडीनंतर दि. बुधवार दि. २९ जुन रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि राज्यात शिंदे गटाला सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. बंडखोर गटानं भाजपच्या मदतीनं दि. ३० जुन रोजी सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
दरम्यान, सत्तास्थापनेला दहा दिवस पुर्ण होत असताना मंत्रीमंडळ विस्तार आणखी बाकी आहे. त्यापुर्वी मंत्रीपदासाठी वेगवेगळे नावे चर्चेले जात असले तरी, कोणतंही नाव अद्याप निश्चित झालेलं नाही. यामुळं शिंदे सरकारमध्ये नेमकं कोणाला संधी दिली जाते? राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात कोण असणार? शिंदे गट आणि भाजप यांच्यात मंत्रीपदांची वाटणी कशी होणार? या मुद्द्यांवर जोरदार चर्चा आणि तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
दोन दिवसाच्या दिल्ली वारीला असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी गाटी घेतल्यानंतर यावर शिक्कामोर्तफ होऊल असे वाटत होते. मात्र शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले, येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्र्यांचे शपथविधी होतील. आषाढी एकादशी झाल्यानंतर मुंबईत भेटून यावर चर्चा करू आणि मंत्रिमंडळ विस्ताराविषयी निर्णय घेऊ. १८ तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होईल. पण पावसाळी अधिवेशनाच्या आधी शपथविधी होणार आहेत, असं शिंदे म्हणाले.