व्हिजन 2035 च्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करणार; मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : (Eknath Shinde On Health Department) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील आरोग्य विभागाच्या (Maharashtra Health Department) कायापालटासाठी व्हिजन 2035 (Vision 2035) जाहीर केलं आहे. त्यामाध्यमातून आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य क्षेत्रातली गुंतवणूकही वाढवण्यात येणार आहे. तसेच राज्यातील रुग्णालयामध्ये औषधखरेदी करण्यात येणार आहे आणि रिक्त पद भरती तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत. राज्यातील 34 जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून दोन आठवड्यात त्यासंबंधित आराखडा तयार करण्यात येणार आहे.
राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने आज राज्य शासनाने मोठे पाउल टाकले आहे. सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारणे तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी युद्धपातळीवर पाऊले टाकण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
येत्या पंधरा दिवसांत सचिवांच्या समितीने नवीन वैदयकीय महाविद्यालयांच्या जोडीने राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त जिल्हा रुग्णालये उभारण्याबाबत आराखडा तयार करण्याचे सांगतांनाच वर्ष 2035 पर्यंत आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाचा विचार करून राज्यासाठी एक आरोग्याचे सर्वंकष व्हिजन तयार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनमधून औषध खरेदीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे त्यांनी वेळ न गमावता आपापल्या जिल्ह्यांतील औषध खरेदी, वैद्यकीय उपकरण खरेदी दरपत्रकानुसार तत्काळ करून घ्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. जीवरक्षक, अत्यावश्यक औषधांची खरेदी वेगळी दरपत्रक मागवून करावी असेही ते म्हणाले.