ठाणे : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभी नाका येथे दहिहंडी सुरु केला. दरम्यान, आज येथिल दहीहंडी कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या अनेक आठवणी जाग्या केल्या ते म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला दहीहंडी उत्सव आता संपूर्ण महाराष्ट्रभर फोफावला आहे. मुंबईतला प्रत्येक गोविंदा टेंभी नाक्याला सलामी देऊन पुढे जातो. हा आपला इतिहास आणि परंपरा आहे. ही परंपरा वाढवण्याचं आणि जोपासण्याचं काम आपलं आहे.
ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं आनंद दिघे यांचं स्वप्न होतं. त्यांच्या पुण्याईमुळे आणि आशीर्वादामुळे मला मुख्यमंत्री म्हणून या दहीहंडीला उपस्थित राहता आलं, हे मी माझं भाग्य समजतो. दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील सर्वात मोठी हंडी फोडली आहे. ती हंडी फोडणं तसं कठीण काम होतं आणि ती खूप उंचही होती. पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे, बाळासाहेब आणि दिघेसाहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही ती हंडी फोडू शकलो.
आज आम्ही ५० थर लावले आहेत. पुढील काळात हे थर आणखी वाढत जातील, याची काळजी करायचं काहीही कारण नाही, असं म्हणत शिंदेंनी शिवसेनेचे चिमटे काढण्याचा प्रयत्न केला. आनंद दिघेंचे दुसरे शिष्य आणि शिंदेंचे घनिष्ठ मित्र शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांचीही याच परिसरात दुसऱ्या दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या ठिकाणी युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिंदेंच्या टिकेवर आदित्य ठाकरे म्हणाले, आजचा अनंदाचा दिवस आहे. तो सर्वांनी उत्साहात साजरा करावा. यामुळे पोरकट राजकारणात मला जायचं नाही, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.