एकनाथ शिंदेंचा आता शिवसेनेच्या मुळावरचं घाव?

मुंबई : (Eknath Shinde take over Shiv Sena) बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे 55 पैकी तब्बल 40 आमदार आणि 18 पैकी 12 खासदारांना फोडून विधिमंडळ आणि संसदेत शिवसेना पक्ष अगोदरच खिळखिळा करुन सोडला आहे. त्यानंतर शिंदेंनी संघटनेच्या मुळावरच घाव घालण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या कृतीमुळे संपूर्ण शिवसेना पक्ष हा ठाकरे कुटुंबीयांच्या हातातून निसटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आजपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडून आमदार, खासदार फुटले असले तरी आमचा पक्ष फुटलेला नाही, असा बचाव सातत्याने केला जात आहे. मात्र, आता एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची प्रतिनिधी सभा आणि पर्यायाने राष्ट्रीय कार्यकारिणीच ताब्यात घेण्याच्या दिशेने पावलं टाकत आहेत. शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेत एकूण २८२ सदस्य आहेत. यापैकी दोन तृतीयांश म्हणजे १८८ सदस्य एकनाथ शिंदे यांनी फोडल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे गटाकडून त्यांच्यासोबत शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेतील १८८ पेक्षा जास्त सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर या सदस्यांची नव्याने नोंदणी सुरु आहे.
एकनाथ शिंदे गटात सामील होऊ इच्छिणाऱ्या जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकांची नोंदणी सुरु आहे. यापैकी अनेकजण शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेचा भाग आहेत. शिवसेनेची हीच प्रतिनिधी सभा राष्ट्रीय कार्यकारिणीतील काही सदस्यांची निवड करते. पक्षांतरबंदी कायद्यानुसार केवळ आमदार, खासदार फुटले म्हणजे पक्षात फूट पडली असे होत नाही. त्यासाठी संघटनेतही फूट असणे आवश्यक असते. शिवसेनेच्या घटनेत ‘शिवसेनाप्रमुख ते शाखाप्रमुख’ अशी एकूण १३ पदे आहेत. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबईतील विभागप्रमुख यांची मिळून एक प्रतिनिधी सभा आहे. या सर्वांसोबत शिंदे गटाकडून संपर्क केला जात या माध्यमातून शिवसनेच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.