आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी! विधिमंडळाच्या सभागृहाच्या नेतेपदी निवड
महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या निकालानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतीच आज शिवसेना ठाकरे गटाची एक बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाचे नवनियुक्त आमदार देखील उपस्थितीत होते. ही बैठक उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली. यामध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या नेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभेतील गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रतोदपदी पुन्हा एकदा सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० जागांवर दणदणीत विजय मिळवला. यात भाजपला १३२, शिंदे शिवसेना ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीला केवळ ४६ जागा मिळाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेला २० जागा मिळाल्या. काँग्रेस १६ आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला १० जागांवर समाधान मानावे लागले. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून ८,८०१ मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी शिंदे शिवसेनेच्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला, तर गुहागर मतदारसंघातून आ. भास्कर जाधव २,८३० मतांनी विजयी झाले. जाधव यांना एकूण ७१ हजार २४१ मते मिळाली, तर महायुतीचे पराभूत उमेदवार राजेश बेंडल यांना ६८ हजार ४११ मते मिळाली. आ. जाधव गुहागर मतदारसंघातून सलग चौथ्यावेळा निवडून आले.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महायुतीला दणदणीत यश मिळाले. महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जादू मुंबईत चालली नाही. मुंबईतील ३६ जागांपैकी महायुतीचे २३ आमदार निवडून आले, तर महाविकास आघाडीला फक्त १२ जागांवर समाधान मानावे लागले. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी मात्र आपली जागा कायम राखली.