अतिवृष्टीतील 98 टक्के ग्राहकांकडे वीजपुरवठा सुरू
महावितरणच्या पुणे परिमंडलातील अभियंते व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत अतिवृष्टीमधील तब्बल १३२७ पैकी १२९६ रोहित्रांचा वीजपुरवठा सुरु करून सुमारे १ लाख १७ हजार ३६५ (९७.७ टक्के) ग्राहकांना मोठा दिलासा दिला. तर शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी उशिरापर्यंत सिंहगड रस्त्यावरील एकतानगर, मावळ, लोणावळा व इतर भागातील सुमारे ३१ रोहित्रांवरील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु होते.
दरम्यान सिंहगड रस्त्यावरील एकतानगरीमध्ये गुरुवारी (दि. २५) महावितरणचे १९ रोहित्र पुराच्या पाण्यात गेल्याने सुमारे ६५ सोसायट्यांमधील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर अभियंते व कर्मचारी यांनी सोसायट्यांच्या सहकार्याने पाण्याचा निचरा झाल्यानंतर आज सकाळपर्यंत वीजसुरक्षेची खात्री करून १४ रोहित्रांचा वीजपुरवठा सुरु केला. उर्वरित ५ पैकी पाण्यात बुडालेले ३ रोहित्र नादुरुस्त झाल्याने ते केवळ एका तासात जेसीबीच्या सहाय्याने आज दुपारी बदलण्यात आले. तसेच दोन रोहित्र सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आले आहे. अद्याप २५ सोसायट्यांमध्ये पाणी आहे. मीटररूममध्ये पाणी आहे. त्यामुळे सुमारे २४०० ग्राहकांकडील वीज सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
तसेच मावळ परिसर, भोरगिरी परिसर, कार्ला परिसरातील दऱ्याडोंगरात असलेल्या २३ रोहित्रांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम अद्यापही सुरु आहे. चिखल व निसरडा रस्ता तसेच माती खचल्यामुळे दुरुस्ती कामांमध्ये अडथळे येत आहेत. यासोबतच रावेत तसेच कोंढवे धावडे आदी ठिकाणी सुमारे ३५० वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत काम सुरु होते.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व मुळशी, मावळ, खेड तालुक्यांत अतिवृष्टीचा व धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या परिसरातील वीजयंत्रणेला मोठा फटका बसला. यासोबतच झाडे व झाडाच्या फांद्या, दरड कोसळल्याने तसेच वीजयंत्रणा पाण्यात गेल्याने गुरुवारी (दि. २५) उच्चदाबाच्या २६ वीजवाहिन्या, १३२७ वितरण रोहित्रांवरील १ लाख १९ हजार ८६५ वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला होता. यातील ९० टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा हा सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंद ठेवावा लागला होता. या सर्व भागात काल दुपारी उशिरा पावसाने उघडीप दिल्यानंतर सोसायट्यांमधील वीजसुरक्षेची खात्री करीत महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्रारंभ करण्यात आला. यात शुकवारी (दि. २६ ) पहाटे १ वाजेपर्यंत तब्बल १३२७ पैकी ११८२ रोहित्रांवरील १ लाख ७ हजार ७०० वीजग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला होता. त्यानंतर आज दिवसभरात आणखी ९ हजार ६६५ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार तसेच अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, अरविंद बुलबुले यांनी रात्री उशिरापर्यंत विविध ठिकाणी भेटी देऊन वीजयंत्रणेची पाहणी केली तसेच दुरुस्ती कामाला वेग दिला