पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारे अकरा बांगलादेशी अटकेत; त्यात अल्पवयीनांचा समावेश
पुणे | विद्येचे माहेघर असणाऱ्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच हडपसर भागात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या अकरा बांगलादेशी नागरिकांना लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी (Pune Police) पकडले आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
निजाम रहीम अली शेख राठी (वय 30), बाबू मोसिन मंडल राठी (वय 30), नजमा बाबू मंडल राठी, (वय 25), कमरोल रोशन मंडल राठी (वय 22), सागर आलम शेख राठी (वय 22), मरियम कमरू मंडल राठी (वय 35), आलम शेख राठी (वय 24), शाहिनूर आलम शेख राठी (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यांच्याकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त करण्यात आले आहे. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र तयार करून विनापासपोर्ट, विनापरवाना राहत असल्याप्रकरणी या आठ जणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर 15 ऑगस्ट 2021 रोजी सात बांगलादेशी नागरिकांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली होती. या सात जणांनी बांगलादेशातील रहिवासी असल्याचे मान्य केले. मात्र, आरोपींकडे बांगलादेशी असल्याबाबतची कागदपत्रे न मिळाल्याने पोलिसांनी त्यांना चौकशी करून सोडून दिले होते. या प्रकरणाचा लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून तपास करण्यात येत होता. त्यानंतर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना आधार कार्ड, पॅन कार्ड; तसेच मतदार ओळखपत्र मिळवून दिल्याचे उघडकीस आले आहे. अटक करण्यात आलेले पुण्यात मजुरी करत होते. मजुरीतून मिळालेले पैसे बांगलादेशातील नातेवाइकांकडे पाठवत होते.