गरबा उत्सवात आधारकार्ड तपासून प्रवेश?

मुंबई : सोमवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात यंदा मोठा जल्लोष पाहायला मिळणार आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मर्यादित असलेला हा महोत्सव यंदा अनिर्बंध स्वरूपात होत आहे. नवरात्राच्या काळात गरबा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या गरबा उत्सवाबाबत विश्व हिंदू परिषदेनेही मोठी मागणी केली आहे.
गरबा हा श्रद्धेचा आणि उपासनेचा विषय असून सार्वजनिक इव्हेंट नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी फक्त हिंदू धर्मीयांना प्रवेश द्या आणि त्यासाठी आधारकार्ड तपासा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने गरबा उत्सव आयोजन करणाऱ्या मंडळांना केली आहे.
गरबा उत्सवात श्रद्धा नसतानाही अनेक इतर धर्मीय प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात. पुढे लव्ह जिहादसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आताच काळजी घेतलेली बरी, असा विश्व हिंदू परिषदेचा या मागणीमागचा तर्क आहे.
सध्याच्या काळात गरब्यामध्ये एक स्पर्धेचे किंवा फॅशनचे युग जरी आले असले तरी मात्र देवीच्या दरबारात गरबा खेळण्याला एक धार्मिक महत्त्व आहे. अंबामातेने महिषासुराचा वध केला, असे मानले जाते. महिषासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळाल्यावर लोकांनी नृत्य केले. या नृत्याला ‘गरबा’ म्हणून ओळखले जाते. मातेची स्थापना केल्यानंतर श्रद्धेने गरबा करण्याची परंपरा सुरू आहे. यामुळे माता प्रसन्न होते, असेदेखील मानले जाते.
यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने विदर्भात अनेक ठिकाणी गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांची भेट घेतली आहे, तर पोलीस अधिकाऱ्यांशी भेटणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांतप्रमुख गोविंद शेंडे यांनी दिली आहे. गरज भासल्यास विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते गरबा उत्सव आयोजनस्थळी उभे राहून मंडळांना मदत करतील, आयोजन मंडळ आणि पोलिसांनी यात पुढाकार घ्यावा, असे शेंडे म्हणाले.