मुंबई : सध्या कोरोनाची पार्श्वभूमी पाहता राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू ऑफलाइन परीक्षा घेण्यावर ठाम आहेत. तसंच १ जून ते १५ जुलै दरम्यान विद्यापीठांकडून परिक्षा घेतल्या जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
विद्यापीठांकडून करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी करण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षेची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली.
उदय सामंत यांनी बैठकीनंतर ट्विटद्वारे माहिती दिली. “कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे. दोन पेपरमध्ये दोन दिवसाचे अंतर असणार आहे, परीक्षा मे मध्ये न घेता १ जून ते १५ जुलै पर्यंत होतील असे कुलगुरूंनी निश्चित केले आहे.”, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.