रोहित्र हटविण्यासाठी दीड कोटींचा खर्च?
जलशुद्धीकरणाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता
पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांसाठी सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत असलेल्या आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याचा मार्ग लवकरच खुलण्याची शक्यता दिसत आहे. गेली अनेक दिवस तारखेवर तारखा अनुभवत असलेल्या नागरिकांना या योजनेच्या शुभारंभाची प्रतीक्षा आहे. धरणातील पाणी आणून ते पाणी शुध्द करण्यासाठी चिखलीत जलशुध्दीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. मात्र, या दौऱ्यात जलशुध्दीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विद्युत रोहित्राचा अडथळा ठरत आहे. ते रोहित्र हटविण्यासाठी तब्बल १ कोटी ५२ लाख १५ हजार रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीच्या बैठकीत दीड कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. आंद्रा व भामा आसखेड या दोन धरणातून २६७ एमएलडी पाणी शहराला मिळणार आहे. आंद्रा धरणाचे १०० एमएलडी पाणी शहरात पहिल्या टप्प्यात येणार आहे. त्यासाठी निघोजे चिखलीतील जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. याचे उद्घाटनही लवकरच करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या जलशुध्दीकरण केंद्राच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस येणार आहेत. जलशुध्दीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला अडथळा ठरणारे रोहित्र हटविण्यासाठी पालिका तब्बल दीड कोटी रुपये खर्च करणार आहे. वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी महापालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणणार आहे. पाणी उचलण्यासाठी महापालिका धरणाजवळ वाकीतर्फे वाडा येथील १.२० हेक्टर जागेत २०० दशलक्ष लीटर (एमएलडी) प्रतिदिनी क्षमतेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रासाठी जॅकवेल, ऍप्रोच ब्रीज, सबस्टेशन बांधणार आहे.
तेथून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँक पर्यंत पाणी आण्यात येणार आहे. तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाणार आहे. महापालिकेच्या सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात भामा आसखेड प्रकल्पाच्या कामाअंतर्गत जॅकवेल व पंप हाऊस बांधणे हे काम आहे. या कामास अंदाजयपत्रकीय रक्कम कमी आहे. त्यामुळे कामाच्या नावात बदल आणि सुधारीत अंदाजपत्रकीय रक्कमेमध्ये बदल करण्यात आला. या कामाची मूळ अंदाजपत्रकीय रक्कम १५० कोटी रुपये इतकी आहे. जीएसटी १८ टक्के, सल्लागाराची फी ५ टक्के आणि १० वर्षे देखभाल दरुस्ती करणे. नवीन दरसुचीच्या दरामध्ये वाढ झाल्याचे कारण देत अंदाजपत्रकीय रक्कमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. कामाची मूळ अंदाजपत्रकीय रक्कम १५० कोटी होती. ती आता १७२ कोटी रुपये केली. त्यामुळे जॅकवेल व पंप हाऊस बांधण्याच्या खर्चात २२ कोटींनी वाढ होणार आहे. जॅकवेल व पंप हाऊस बांधणे या कामाच्या नावातही बदल केला आहे. भामा आसखेड धरणाजवळ वाकीतर्फे वाडा येथे अशुद्ध जलउपसा केंद्र बांधणे व त्यासाठी जॅकवेल, पंपहाऊस, अँप्रोच ब्रिज, इंटेक चॅनेल बांधणे व विद्युत, यांत्रिकी, इन्स्ट्रुमेंटेशन, स्काडासह इतर अनुषंगिक कामे करणे आणि १० वर्षे देखभाल दुरुस्ती करणे, असे नामकरण करण्यात आले.