महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार १२ वीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
परंतु आता ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह १२ वीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
राज्य मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाते.
तर बारावीचा निकाल मे महिन्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणत: जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाते. दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून १० नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. त्यासाठी परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र हॉल तिकिटे डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.