न्याय्य मागणी

पाकिस्तानमधून भारतात आलेल्या काही पत्रकारांनी ‘आयएसआय’साठी माहिती गोळा केली होती, असा दावा नुसरत मिर्झा या कथित पाकिस्तानी गुप्तहेराने केल्याने अन्सारी भाजपनेत्यांच्या निशाण्यावर आले. नुसरत मिर्झा यांनीच अन्सारी यांनी त्यांना निमंत्रण दिल्याचे सांगितल्याने त्यांची आणि काँग्रेसची पंचाईत झाली आहे. कायम वादात राहिलेले अन्सारी यांची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी भाजप करीत आहे आणि ती न्याय्य आहे.
अन्सारी यांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा पाहिला तर वादाच्या भोवर्यात अडलकेलेला आहे. त्यांनी कितीही गौरवाने स्वतःबद्दल सांगितले तरी वाद आणि त्यांचे नाते कायम राहिले. मोदींच्या कार्यकाळात तर ते स्पष्ट झाले. यांनी आपल्या कार्यकाळात पाकिस्तानी पत्रकाराला पाच वेळा भारतात बोलावले. यावरून भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी अन्सारी यांच्याबरोबरच काँग्रेसच्या तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या धोरणांपुढेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अन्सारी यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले असले तरी त्यावरून आता गदारोळ सुरू झाला आहे. या वादावरून परराष्ट्र मंत्रालय, उपराष्ट्रपतींचे कार्यालय, त्यांच्या कार्यपद्धती, बाहेरच्या देशांमधल्या लोकांना भारतात बोलावण्याचे नियम आदींचीही चर्चा सुरू झाली आहे. अन्सारी यांनी आणि भाजप आणि मीडियाचा एक भाग आपल्याविरोधात खोटे पसरवत असल्याचा आरोप केला आहे.
भाजपकडून अन्सारी यांच्यावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. उपराष्ट्रपतिपदावर असतानाही नरेंद्र मोदी सरकारशी त्यांचे संबंध चांगले नव्हते. अन्सारी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात आपण कधीही पाकिस्तानी पत्रकाराला फोन केला नाही किंवा भेटलो नाही, असे स्पष्ट केले आहे. अन्सारी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की भारताचे उपराष्ट्रपती या नात्याने परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्याचा निर्णय त्या वेळच्या सरकारचा होता. ११ डिसेंबर २०१० रोजी अन्सारी यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि मानवाधिकार या विषयावरील न्यायवैद्यक परिषदेचे उद्घाटन केले होते. सहसा अशा संमेलनातील पाहुण्यांची यादी आयोजकांकडून तयार केली जाते. भाजपच्या अन्य एका आरोपाबाबत अन्सारी म्हणाले, की इराणमधील भारताच्या राजदूताचे काम सरकारच्या माहितीत आहे. मी देशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे आणि त्यावर वक्तव्य करण्यापासून स्वतःला नेहमीच दूर ठेवतो. भारत सरकारकडे सर्व माहिती आहे आणि तेच सत्य सांगू शकते. मला न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रात भारताचा स्थायी सदस्य बनवण्यात आले. माझ्या कामाचे देशात आणि जगात कौतुक झाले आहे. अन्सारी यांचे असे म्हणणे असले, तरी आता काँग्रेसचे त्या वेळचे सरकार अडचणीत आले आहे. भारतात एखाद्याला पाहुणे म्हणून निमंत्रण देताना त्याची पार्श्वभूमी गुप्तचर विभागाकडून तपासली जात नव्हती का, असा प्रश्न निर्माण होतो.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यानंतर सलग दोन पूर्ण टर्म भारतातले दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद भूषवण्याची संधी अन्सारी यांना मिळाली. २०१७ मध्ये संपलेल्या त्यांच्या दुसर्या कार्यकाळाच्या तीन वर्षांमध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार होते. अन्सारी यांनी आपल्या ‘बाय मेनी अ हॅप्पी अॅक्सिडेंट : रिकलेक्शन्स ऑफ अ लाइफ’ या पुस्तकात लिहिले आहे, की राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी गदारोळात कोणतेही विधेयक मंजूर होऊ दिले नाही. त्यांच्या पुस्तकात मोदी यांच्यावर आरोप आहे. मोदी एके दिवशी त्यांच्या कार्यालयात आले आणि गदारोळात विधेयके का मंजूर केली जात नाहीत, असा प्रश्न विचारला. मोदी तेव्हा म्हणाले, की तुमच्याकडून मोठ्या जबाबदार्या अपेक्षित आहेत; पण तुम्ही मला मदत करीत नाही. त्यावर अन्सारी यांनी राज्यसभेतले आणि बाहेरच्या जगातले माझे काम जगजाहीर आहे, असे उत्तर दिले. अन्सारी यांनी निरोप समारंभात याचा उल्लेख केला. मोदी यांनी भाषणात आपल्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल अन्सारी यांनी खेद व्यक्त केला होता.
ऑगस्ट २०१७ मध्ये राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा शेवटचा दिवस होता. त्या वेळी अन्सारी म्हणाले, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हवाला देऊन मी २०१२ मध्ये काही तरी बोललो होतो. आजही मी त्यांचे शब्द उद्धृत करीत आहे. लोकशाहीचे वैशिष्ट्य म्हणजे अल्पसंख्याकांना रास्त प्रमाणात संरक्षण दिले जाणे. लोकशाहीत विरोधी गटांना सरकारच्या धोरणांवर मोकळेपणाने आणि उघडपणे टीका करण्याची परवानगी नसेल, तर त्याचे रूपांतर अत्याचारात होते. त्याच वेळी अल्पसंख्याकांची जबाबदारीही आवश्यक आहे. त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे; पण त्या अधिकाराचा अर्थ संसदेत अडथळा आणणे असा नाही.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही मोदी यांनी अन्सारी यांना टीकेचे लक्ष्य बनवले होते. आता तर भाजपच्या हाती आयते कोलित पडले आहे. भारतात जसे पाकिस्तानमधले काही पत्रकार येत असतात, तसेच भारतातले काही पत्रकारही पाकिस्तानमध्ये जात असतात. दोन्ही देशांमध्ये सुसंवाद राखण्यासाठी असे उपक्रम आयोजिले जातात. पाकिस्तानमधून भारतात आलेल्या काही पत्रकारांनी ‘आयएसआय’साठी माहिती गोळा केली होती, असा दावा नुसरत मिर्झा या कथित पाकिस्तानी गुप्तहेराने केल्याने अन्सारी भाजपनेत्यांच्या निशाण्यावर आले. नुसरत मिर्झा यांनीच अन्सारी यांनी निमंत्रण दिल्याचे सांगितल्याने त्यांची आणि काँग्रेसची पंचाईत झाली आहे. कायम वादात राहिलेले अन्सारी यांची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी भाजप करीत आहे आणि ती न्याय्य आहे.