पाकिस्तानी फखर जमान रचला इतिहास! २०१७ साली पळवला होता भारताच्या तोंडचा घास
Fakhar Zaman News Record : पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर फखर जमानने वर्ल्ड कप 2023 मध्ये आणखी एक उत्कृष्ट खेळी खेळली आहे. या दरम्यान फखर जमानने पाकिस्तानसाठी इतिहास रचला आहे. न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानच्या करो या मरोच्या सामन्यात 402 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फखर जमानने शतक ठोकले.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वर्ल्ड कपच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये फखर जमानने 63 चेंडूत 6 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. फखर जमानने बांगलादेशविरुद्ध 74 चेंडूत 81 धावा केल्या होत्या.
फखर जमन येथे मोठी इनिंग खेळण्यात यशस्वी ठरला तर पाकिस्तान संघ इतिहास रचू शकतो. कारण वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत पाकिस्तानसमोर इतके मोठे लक्ष्य कधीच गाठले नाही. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसाठी सर्वात वेगवान शतक झळकावण्यात फखर जमानने इम्रान नाझीरला मागे टाकले आहे. इम्रान नाझीरने किंग्स्टन येथे 2007 च्या वर्ल्ड कप सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध 95 चेंडूत शतक झळकावले होते.
फखर जमान हा तोच फलंदाज आहे ज्याने 2017 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या तोंडचा घास पळवला होता. 2017 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने फखर जमानच्या 114 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला विजयासाठी 339 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया केवळ 158 धावांवर आटोपली.
टीम इंडियाला 180 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही त्यांच्या हातून निसटले. 2017 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या या पराभवानंतर टीम इंडियाचे तत्कालीन कोच अनिल कुंबळे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.