प्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई | Pradeep Sarkar Passed Away – सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार (Pradeep Sarkar) यांचं निधन झालं आहे. ते 67 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रदीप सरकार किडनीच्या समस्येचा सामना करत होते. त्यांचं डायलिसिसही सुरू होतं. तसंच यांच्या शरीरातील पोटॅशियम लेव्हल कमी झाली होती. त्यामुळे त्यांना रात्री तीन वाजता मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आज (24 मार्च) दुपारी चार वाजता सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत प्रदीप सरकार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसंच प्रदीप यांच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी आणि नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
फिल्म मेकर हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रदीप सरकार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हंसल मेहता यांनी ट्विटरवर प्रदीप यांचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ‘प्रदीप सरकार दादा. तुमच्या आत्म्याला शांती लाभो.’ तसंच अभिनेता अजय देवगणनंही ट्वीट करत लिहिलं, ‘आपल्याला प्रदीप सरकार हे सोडून गेले आहोत, हे आपल्यापैकी अनेकांना अजूनही खरं वाटत नाहीये. दादा तुमच्या आत्म्यास शांती लाभो.’
दरम्यान, प्रदीप सरकार यांनी 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परिणीता’ या चित्रपटामधून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तसंच त्यांनी लागा चुनरी में दाग : जर्नी ऑफ अ वूमन, हेलीकॉप्टर ईला, लफंगे परिंदे, मर्दानी यांसारख्या सुपरहीट चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय.