अर्जेंटिना-ब्राझील सामन्यात तुफान राडा; पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये फॅन्स रक्तबंबाळ!
FIFA World Cup Qualifier : विश्वचषक पात्रता सामन्यादरम्यान ब्राझील आणि अर्जेंटिनाचे चाहते एकमेकांना भिडले. यादरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार लाथा-बुक्क्या झाल्या आणि अनेक चाहते जखमी झाल्याचीही बातमी आहे. यामुळे ब्राझील विरुद्ध अर्जेंटिना फिफा विश्वचषक पात्रता सामन्याची सुरुवात चाहत्यांमध्ये झालेल्या भांडणामुळे 30 मिनिटे उशीराने सुरू झाली.
राडा इतका वाढला की अर्जेंटिना फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी खेळाडूंना घेऊन मैदानाबाहेर गेला. यामुळे सामना जवळपास 27 मिनिटे उशिराने सुरू झाला. चाहत्यांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. चाहत्यांवर लाठीचार्ज करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात एका चाहत्याचे डोके फुटले व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत आहे.
नेमकं काय घडलं ?
सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे राष्ट्रगीत झाले, तेव्हा अर्जेंटिनाचे चाहते आणि तेथील स्थानिक प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाली. ब्राझीलच्या चाहत्यांनी लिओनेल मेस्सीची खिल्ली उडवली त्यामुळे हाणामारी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी काही लोकांनी ब्राझीलच्या पोलिसांवर हात उचला. चाहत्यांची भांडण सोडवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
त्यावेळी लिओनेल मेस्सीने ब्राझीलच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, परिस्थिती शांत झाल्यावरच मैदानात येईल. यामुळेच अर्जेंटिनाचा संघ 22 मिनिटांनी मैदानात आला. यानंतर खेळ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे सराव केला.