पुणे : काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेले एकनाथ शिंदे यांच्यासारखेच हुबेहूब दिसणारे पुण्यातील एक व्यक्ती सोशल मिडीया वर चांगलेच झळकले होते. मात्र, सध्या ते अडचणीत सापडले आहेत. समाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन केल्याच्या आरोपात त्यांच्यावर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोण आहेत ‘डुप्लीकेट एकनाथ शिंदे’?
काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका ‘डुप्लीकेट एकनाथ शिंदे’चा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत होता. पुण्यातील हुबेहूब एकनाथ शिंदे यांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचं विजय माने असं नाव आहे. विजय माने यांची दाढी, कपाळावरचा टिळा, पंधरा शर्ट, चष्मा एकदम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसाराखाच आहे. त्यामुळं मागील काही दिवसांपासून माने चर्चेत होते.
म्हणून गुन्हा दाखल झाला?
माने आणि मुख्यमंत्र्यांची काहीच दिवसांपूर्वी भेट झाली होती. मात्र, त्यानंतर माने यांचे सराईत गुंड शरद मोहोळ सोबतचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झालेले दिसत आहेत.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘माने हे नियमितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा आणि पोशाख करून विविध कार्यक्रमांत, सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा, अशा पद्धतीने वावरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न माने करत आहेत. सराईत गुंडांसोबतचे फोटो व्हायरल करून गैरसमज पसरवण्याचं काम माने करत आहेत.’ असं फिर्यादीत म्हटलं आहे.
विजय मानेंची प्रतिक्रिया
विजय माने यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, “मी शरद मोहोळ ला ओळखत नाही. माझे नकळत कसे फोटो काढण्यात आले मला माहिती नाही. कोणत्याही प्रकरणाची शहानिशा न करता माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी अनेकवेळा मुख्यमंत्री साहेबांना आणि माध्यमांना सागीतलं आहे की, मुख्यमंत्री साहेब माझ्यासाठी देव आहेत. त्यांची प्रतिमा मलीन होईल असं कोणतंही कृत्य मी केलें नाही आणि कधी करणारही नाही. खोटा आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. नकळत कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो.” अशी प्रतिक्रिया विजय माने यांनी दिली आहे.