17 दिवसांनी अखेर सुटका! सिल्क्यारा बोगद्यातून अडकलेले 41 कामगार बाहेर
उत्तराखंड : येथील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. मोठ्या प्रयत्नानंतर त्यांना तब्बल १७ दिवसांनंतर बाहेर काढण्यात यश आलं आहे. १२ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी ही घटना घडली होती. तेव्हापासून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बोगद्यात जाऊन मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश आलं आहे.
बोगद्याचे काम सुरू असताना त्याचा काही भाग कोसळल्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी ऐन दिवाळीमध्ये 41 मजूर बोगद्यात अडकले होते. त्या दिवसापासून सुरू झालेलं बचावकार्यात आज पुर्ण झालं आहे. तर या बचावकार्यात अनेक अडथळे येत होते. मात्र हवाई दल, ओएनजीसी, डीआरडीओसह अन्य सरकारी यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून बचाव कार्य अचूकपणे सुरू केले आहे. या बचावकार्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेतली असून अत्याधुनिक ड्रिलिंग मशिन्सद्वारे खोदकाम करण्यात आले.
मजूरांना बोगद्याच्या बाहेर काढण्यासाठी बोगद्याच्या सर्व बाजूंनी खोदकाम करण्यात येत होते. यामध्ये महत्त्वाचे काम केले ते म्हणजे रॅट मायनर्सने. ऑगर मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर उर्वरित काम पूर्ण करण्याची जबाबदारी रॅट मायनर्सने घेतली. 17 दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात देश-विदेशातील मोठमोठी मशीन्स अपयशी ठरत असताना, रॅट मायनर्सने शर्थीचे प्रयत्न करत त्यांना बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.