धक्कादायक! निवृत्त जवानाकडून धावत्या एक्सप्रेसमध्ये गोळीबार; रिव्हॉलव्हरमधून गोळी झाडली अन्…
Rajdhani Express | नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका निवृत्त जवानानं धावत्या एक्सप्रेसमध्ये गोळीबार (Firing) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झारखंडहून दिल्लीला जाणाऱ्या सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये (Rajdhani Express) हा प्रकार घडला आहे. निवृत्त जवानाचं कोच अटेंडंटसोबत काही मुद्द्यावरून वाद झाल्यानं त्यानं रागाच्या भरात गोळीबार केल्याचं म्हटलं जातंय.
गुरूवारी (12 ऑक्टोबर) रात्री सियालदह राजधानी एक्स्प्रेसमध्ये लष्कराच्या शीख रेजिमेंटच्या एका मद्यधुंद निवृत्त सैनिकानं गोळीबार केला. हरपिंदर सिंग असं या आरोपीचं नाव आहे. आरोपी हरपिंदर सिंग धनबादहून रेल्वेच्या बी-8 बोगीत चढला होता. तर रेल्वे मातारी स्थानकावरून जात असताना हरपिंदरनं त्याच्या परवाना असलेल्या रिव्हॉलव्हरमधून गोळी झाडली. त्यानं धावत्या एक्सप्रेसमध्ये गोळीबार करताच बोगीत एकच गोंधळ निर्माण झाला होता.
आरोपी हरपिंदर सिंगनं गोळीबार केल्यानंतर ट्रेनमधील सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं. तसंच सुरक्षा रक्षकांनी याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. तर या धक्कादायक प्रकारानंतर राजधानी एक्सप्रेस कोडरमा स्थानकावर थांबवण्यात आली. तेथून आरोपीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर आपल्याकडून चुकून गोळी सुटल्याचं आरोपी हरपिंदर सिंगनं म्हटलं आहे.