अयोध्या राम मंदिर परिसरात गोळीबार; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रामजन्मभूमी येथे असलेल्या राम मंदिरात एका एसएसएफ जवानाचा संशयास्पद गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे ५.२५ वाजता घडली. राम मंदिर परिसरात गोळीबाराचा आवाज ऐकू येताच सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, जखमी जवानाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी जवानाला मृत घोषित केले. शत्रुघ्न विश्वकर्मा (वय २५) असे मृत जवानाचे नाव आहे.
रामजन्मभूमी संकुलात एकच खळबळ
ही घटना उघडकीस येताच रामजन्मभूमी संकुलात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण रामजन्मभूमी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रामजन्मभूमी संकुलातील आहे. प्राथमिक तपासात ही आत्महत्या किंवा अपघात असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच कारण स्पष्ट होईल.
घटनास्थळाची कसून चौकशी
जवानाच्या मृत्यूनंतर मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आयजी आणि एसएसपी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची कसून चौकशी करण्यात आली. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी पोहोचून तपास केला. प्राथमिक तपासानंतर हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.
शत्रुघ्न विश्वकर्मा हे २०१९ च्या बॅचचे होते. ते आंबेडकर नगरच्या सन्मानपूर पोलीस ठाण्याच्या काजपुरा गावचे रहिवासी होते. ते एसएसएफमध्ये तैनात होते. अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी एसएसएफ दलाची स्थापना करण्यात आली आहे.
शत्रुघ्नच्या मित्रांनी सांगितले की, घटना घडण्यापूर्वी शत्रुघ्न फोनकडे पाहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो थोडा चिंतेत होता. पोलिसांनी या घटनेची माहिती जवानाच्या कुटुंबीयांना दिली आहे.
तीन महिन्यांपूर्वीही गोळी लागल्याची घटना –
तीन महिन्यांपूर्वीही राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानाला गोळी लागली होती. बंदुक साफ करताना ही घटना घडली होती. बंदूक साफ करत असताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि गोळी झाडली गेली, असे सांगण्यात आले होते. ती गोळी थेट तरुणाच्या छातीतून गेली.
एसएसएफ म्हणजेच विशेष सुरक्षा दलाची स्थापना योगी सरकारने चार वर्षांपूर्वी केली होती. एसएसएफला वॉरंटशिवाय कोणालाही अटक करण्याचा अधिकार आहे. या दलाचे नेतृत्व एडीजी स्तरावरील अधिकारी करतात.
One Comment