इंदूरमध्ये श्वान फिरवण्याच्या वादातून गोळीबार, दोन जणांचा मृत्यू
इंदूर | Indore Crime – इंदूरमध्ये (Indore) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. श्वान फिरवण्याच्या वादातून एका सुरक्षारक्षकानं बेछूट गोळीबार केला आणि या गोळीबारत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सहा जण जखमी झाले आहेत. हा धक्कादायक प्रकार इंदूरच्या खजराना पोलीस स्टेशन अंतर्गत घडला आहे. राजपाल रजावत असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आरोपी राजपाल रजावत हा बँकेचा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तो गुरूवारी (17 ऑगस्ट) संध्याकाळी आपल्या पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला घेऊन गेला होता. त्यावेळी त्याच्या कुत्र्याचं शेजारच्या घरातील कुत्र्यासोबत भांडण झालं. त्यामुळे दोन्ही कुत्र्यांच्या मालकांमध्येही वाद सुरू झाला. हा वाद इतका टोकाला गेला की आरोपी राजपाल घरात गेला आणि परवाना असलेली बंदूक घेऊन आला आणि शेजारच्या घरावर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. राहुल वर्मा आणि विमल वर्मा अशी मृत व्यक्तींची नावं आहेत.
दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी राजपाल रजावतसह त्याचा मुलगा आणि त्याच्या एका नातेवाईकवर गुन्हा दाखल केला असून या तिघांनाही अटक केली आहे. तसंच या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.