रतन टाटा यांना प्रदान करण्यात येणार पहिला ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’
मुंबई | Maharashtra Udyog Award – राज्य शासनानं महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर यावर्षी नामांकित उद्योजकांना ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पद्मविभूषण रतन टाटा (Ratan Tata) यांना पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यावर्षीचे उद्योग पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तसंच आदर पुनावाला यांना उद्योगमित्र पुरस्कार, गौरी किर्लोस्कर यांना उद्योगिनी पुरस्कार आणि विलास शिंदे यांना उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार प्रदान सोहळा 20 ऑगस्टला दुपारी 2 वाजता पार पडणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलमधील जियो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंतस उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ. विपीन शर्मा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.