मोहिते पाटील यांचे वर्तुळ होणार पूर्ण ? पाच वर्षांपूर्वी याच दिवशी झाले होते भाजपवासी
पंढरपूर | बरोबर पाच वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच म्हणजे 19 मार्च 2019 रोजी रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून एकच खळबळ उडवून दिली होती. जिल्ह्यांमध्ये लक्ष्मणराव ढोबळे, सुधाकर पंत परिचारक आदी ज्येष्ठ नेते भाजपा वासी झाल्यानंतर आजच्या दिवशी रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षामधील प्रवेशाची घोषणा केली. आज पाच वर्षानंतर याच दिवशी भाजपाशी फारकत घेण्याचे त्यांचे मनसुबे जाहीर झाले असून पुन्हा ते शरद पवार यांच्या जवळ जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. आता शरद पवार यांच्याकडे घड्याळ राहिले नसून तुतारी आहे , त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हातात तुतारी घेऊन उमेदवारीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुरू केलेल्या गाव भेट दौऱ्याने भाजपातून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता त्याला भगदाड पाडून अनेकांनी भारतीय जनता पक्षात जाणे पसंत केले . परंतु मोहिते पाटील घराणे शेवटपर्यंत राष्ट्रवादी सोबत होते . परंतु १९ मार्च २०१९ रोजी विजयसिंह मोहिते पाटील यांनी कौल दिला आणि रणजीत दादांनी हातात कमळ घेतले. मोहिते पाटील यांचा भाजपाचा घरोबा केवळ पाच वर्षे टिकला. जर मोहिते पाटील यांनी पुन्हा तुतारी हातात घेऊन राष्ट्रवादीशी संगणमत केले आणि शरद पवारांच्या चरणी आपली निष्ठा पुन्हा वाहिली तर त्यांनी पाच वर्षात एक वर्तुळ पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया जिल्ह्यात व्यक्त होत आहे.