सँडविच 350 तर चहा 150 रुपयांचा; ग्राहकांकडून जादा दर आकारूनही पुणे विमानतळावर निकृष्ट दर्जाचे पदार्थ
पुणे | विमानतळावर खाद्यपदार्थ विक्रेते प्रवासी ग्राहकांकडून जादा दर आकारत असल्याचे सातत्याने पुढे आले आहे. प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ दिले जात असल्याच्या तक्रारींचे प्रमाणही वाढले आहे. अशातच पुणे विमानतळावर प्रवाशांना महागड्या दराने खाद्यवस्तूंची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे विमानतळावर सँडविचसाठी 350 रुपये आणि यंत्रातील चहासाठी 150 रुपये प्रवाशांना मोजावे लागत आहेत. त्यातही सँडविचसह इतर खाद्यपदार्थ हे ताजे बनवून दिले जात नाहीत, तर ते आधीच बनवून ठेवलेले असतात. त्यामुळे त्यांच्या दर्जाबाबतही प्रवासी तक्रार करीत आहेत. दरम्यान, विमानतळ प्रशासनाने खाद्यपदार्थांचे दर बाजारभावानुसार असून, विक्रेत्याने जादा दर लावल्याचे समोर आल्यास कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.
विमानतळातील खाद्यपदार्थांचे दर बाजारभावानुसार आहेत. विक्रेत्यांनी जादा दर आकारल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल. याआधीही या विक्रेत्याला 10 हजार रुपयांचा दंड केला होता. आता पुन्हा दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. याचबरोबर स्वस्तातील पिण्याचे पाणी आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आले आहेत. सर्व विक्रेत्यांना खाद्यपदार्थांचे दर दर्शनी भागात लावण्याच्या सूचना पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी केल्या आहेत.