ताज्या बातम्यादेश - विदेश

माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी परराष्ट्र मंत्री के. नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात नटवर सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या (१२ ऑगस्ट) दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी परराष्ट्र मंत्री के. नटवर सिंह यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नटवर सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, “नटवर सिंह यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांनी मुत्सद्देगिरी आणि परराष्ट्र धोरणात भरीव योगदान दिले आहे. ते त्यांच्या बुद्धीमत्तेसाठी तसेच विपुल लेखनासाठी देखील ओळखले जात होते. या दु:खाच्या क्षणाला माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत  आणि चाहत्यांसोबत आहेत.”

वैयक्तिक जीवन

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात रियासतमध्ये १९३१ मध्ये कुंवर नटवर सिंह  यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण मेयो कॉलेज, अजमेर आणि सिंधिया स्कूल, ग्वाल्हेर येथे झाले. यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या कॉर्पस क्रिस्टी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि चीनमधील पेकिंग विद्यापीठात काही काळ विजिटिंग स्कॉलर म्हणून काम केले. ऑगस्ट १९६७ मध्ये सिंह यांनी महाराजकुमारी हेमिंदर कौर यांच्याशी विवाह केला.

राजकीय जीवन 

कुंवर नटवर सिंह यांची १९५३ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत निवड झाली. १९८४ मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी सेवेचा राजीनामा दिला. त्यांनी निवडणूक जिंकली आणि १९८९ पर्यंत केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केले. यानंतर २००४ ते २००५ पर्यंत परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले.

इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सिंह यांनी पोलंड, यूके, पाकिस्तान या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले. २००५ मध्ये, त्यांचे नाव ‘ऑइल फॉर फुड’ घोटाळ्यात आले आणि मोठ्या विरोधानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनीही काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले होते.

पद्मभूषणने सन्मानित

माजी परराष्ट्र मंत्री के. नटवर सिंग यांना १९८४ मध्ये पद्मभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असली तरी त्यातील सर्वात प्रसिद्ध पुस्तक म्हणजे ‘वन लाइफ इज नॉट इनफ’ या पुस्तकात त्यांनी त्यांचा राजकीय अनुभव आणि जीवनाविषयी सविस्तर सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये