“पुढच्या वेळी तुम्ही युपीमध्ये आलात तर…”, माजी IAS अधिकाऱ्याची नाना पाटेकरांना धमकी
Nana Patekar | सध्या अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच नाना पाटेकरांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये नानांनी वाराणसीमध्ये शुटींग करताना सेल्फी घ्यायला आलेल्या एका मुलाच्या डोक्यावर जोरात मारल्याचं दिसत होतं. या व्हिडीओनंतर नाना चांगलेच चर्चेत आले होते.
या व्हायरल व्हिडीओनंतर नाना पाटेकरांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. त्यानंतर नानांनी झालेल्या प्रराकाराबाबत स्वत: माफी मागितली. अशातच आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण या प्रकरणावरून नाना पाटेकरांना माजी IAS अधिकारी अभिषेक सिंग (Abhishek Singh) यांनी धमकी दिली आहे.
IAS अधिकारी अभिषेक सिंग म्हणाले की, “एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया कशी द्यायची हे उत्तर प्रदेशमधील लोकांना चांगलंच माहिती आहे. आम्ही लोक सर्व बाजूंनी परिपूर्ण आहोत. आम्ही आलेल्या पाहुण्यांचा आदर आणि स्वागत चांगल्या प्रकारे करतो. सोबतच त्यांना आम्ही मारहाण देखील चांगल्या प्रकारे करू शकतो.”
“त्यामुळे तुम्ही पुढच्या वेळी युपीमध्ये आलात तर त्यावेळी तुमच्यासोबत चांगला व्यवहार होणार नाही याची विशेष काळजी आम्ही घेऊ”, अशी धमकी अभिषेक सिंग यांनी दिली आहे.