महिला क्रिकेटपटूचं निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा

झिम्बाब्वे | Cricketer Sinikiwe Mpofu Passed Away – क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. झिम्बाब्वेच्या माजी क्रिकेटपटू आणि महिला प्रशिक्षक सिनिकीवे मोफू (Sinikiwe Mpofu) यांचं निधन झालं आहे. त्या 37 वर्षांच्या होत्या. मीडिया रिपोर्टनुसार, मोफू या घरी असताना अचानक जमिनीवर कोसळल्या. त्यानंतर त्यांना रूग्णालयात नेलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मोफू यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.

सिनिकीवे मोफूवर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दु:खाचा डोंगर कोसळला होता. तिचे पती शेफर्ड मुकुनुरा यांचं 15 डिसेंबर रोजी निधन झालं आहे. ते बरेच दिवस आजारी होते. शेफर्ड मुकुनुरा हे झिम्बाब्वेचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. तसंच आता मोफूचाही मृत्यू झाल्यामुळे त्यांची दोन मुले अनाथ झाली आहेत.

सिनिकीवे मोफू या खेळाडू-प्रशिक्षक बनणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू होत्या. त्यांच्या प्रशिक्षणाखाली 2020-21 मध्ये माउंटेनियर्सच्या संघानं एकदिवसीय स्पर्धा जिंकली होती. गेल्या वर्षी त्यांनी संघाला अंतिम फेरीत नेलं होतं आणि त्या उपविजेत्या ठरल्या होत्या. तसंच झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेटमध्ये सिनिकीवे मोफू यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. दरम्यान, मोफू यांच्या निधनाबद्दल झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानं शोक व्यक्त केला आहे.

Sumitra nalawade: