महाराष्ट्रातील उद्योगांपाठोपाठ आता वन्यप्राणीही जाणार गुजरातमध्ये
नागपूर | मागील काही महिन्यांत महाराष्ट्रातील उद्योग गुजरात राज्यात गेल्यावरुन राजकारण चांगलचं तापलं होतं. अशात आता बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपुर येथील चार वाघ आणि चार बिबट कुणालाही कानोकान खबर लागू न देता शनिवारी रात्री गुजरातला रवाना करण्यात आले. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात हल्लेखोर असण्याच्या नावाखाली सुरू असलेली वाघ आणि बिबट्यांची धरपकड गुजरातसाठीच तर नाही ना, अशी शंका यायला लागली आहे.
यापूर्वी सुद्धा अहमदाबादच्या कमला नेहरू प्राणीसंग्रहालयाला दोन वाघ देण्याच्या आणि त्यांच्याकडून कोल्हा, इमू यासह इतर काही प्राणी स्वीकारण्याच्या प्रस्तावाला औरंगाबाद महापालिकेने मंजूरी दिली होती. तसेच त्यापूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरलेले हत्ती गुजरातला हलवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी गोरेवाडा प्रकल्पातून दोन वाघ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी नेण्यात आले होते. मात्र, हे वाघ घेऊन जाताना गुजरातमधील जामनगरमधील एका मोठ्या उद्योगपतीच्या खासगी प्राणीसंग्रहालयातील काही अधिकारी गोरेवाडा प्रकल्पाला भेट देऊन गेले. ज्या वाघांची निवड झाली होती, ज्यावर केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने शिक्कामोर्तब केला होता, ते न नेता इतर वाघ नेण्यात आल्याचे सांगितले जाते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी वाघ नेले जात असताना गुजरातच्या या खासगी प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे अधिकारी तेथे काय करत होते, हाही प्रश्न त्यावेळी तिथे उपस्थित झाला. या खासगी प्राणीसंग्रहालयासाठी प्रसिद्ध वाघ “साहेबराव” वर प्राधिकरणाने शिक्कामोर्तब केले होते. मात्र, “साहेबराव” ला नेण्यातच आले नाही. विशेष म्हणजे यादरम्यान केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची चर्चा होती.