शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीला वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामना पडला महागात; तिकिटांच्या नावाखाली 35 लाखांना गंडा
मुंबई | World Cup Tickets : नुकताच वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) पार पडला. यंदाच्या वर्ल्ड कपचं भारतामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. पण फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. अशातच आता वर्ल्डकपच्या तिकिटांबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वर्ल्ड कपच्या तिकिटांचा काळाबाजार झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे अनेकांची फसवणूक झाल्याचं समोर येत पोलिसांनी अनेकांना अटक केली होती. यामध्ये आता शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची देखील मोठी फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे.
भारतीय चाहते भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी नेहमी आतुर असतात. तर शिंदे गटातील नेते विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांची पत्नी पल्लवी सरमळकर यांना देखील भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिट खरेदी करायची होती. ही तिकिटे खरेदी करताना त्यांची मोठी फसवणूक झाली.
भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिट देतो असं सांगत पल्लवी सरमळकर यांना तब्बल 35 लाखांना गंडा घालण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सामन्याआधी त्यांना तिकिटं मिळाली नाहीच तसंच त्यांना पैसेही परत करण्यात आले नाहीत.
या धक्कादायक प्रकारानंतर अनेक दिवस होऊनही आरोपी पैसे परत करत नसल्यामुळे पल्लवी सरमळकर यांनी पोलीस स्टेशमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत आरोपी सौरभ निकम आणि व्यंकट मंडाला यांना अटक केली आहे.