‘गांधी गोडसे एक युद्ध’ वादाच्या भोवऱ्यात; सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी, म्हणाले…

मुंबई : (Gandhi Godse Ek Yudh) ‘गांधी गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) हा बहुचर्चित सिनेमा येत्या 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता या सिनेमासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या सिनेमाच्या प्रमोशनला निर्मात्यांनी सुरुवात केली आहे. निर्मात्यांना काळे झेंडे दाखवण्यासोबत जोरदार घोषणाबाजी करत प्रमोशनदरम्यानच या सिनेमाला विरोध दर्शवण्यात येत आहे. गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेमधील युद्धावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे आता रिलीजआधीच सिनेमाला (Gandhi Godse Ek Yudh Controversy) अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अमर हुतात्मा हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे (Sandeep Kale) यांनी मागणी केली आहे की, “गांधी गोडसे एक युद्ध’ या सिनेमात नथुरामाला (Nathuram Godase) खलनायक दाखवल्यास सिनेमागृहात जाऊन या सिनेमाचे शो बंद करण्यात येतील. तसेच गोडसे यांची बाजू योग्य पद्धतीने मांडल्यास हा सिनेमा करमुक्त करावा”.
‘गांधी गोडसे एक युद्ध’ या सिनेमाच्या निषेधाबद्दल भाष्य करताना या सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) म्हणाले, “गांधी गोडसे एक युद्ध या सिनेमात महात्मा गांधी किंवा नथुराम गोडसे यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा आहे. त्यामुळे विरोधकांनी आधी सिनेमा पाहावा आणि त्यानंतर सिनेमावर टीका करावी. गांधी आणि गोडसे या दोन्ही पात्रांना समान महत्त्व देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.”



