ताज्या बातम्यापुणे

खळबळजनक! पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात पुन्हा सापडला गांजा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात पुन्हा एकदा गांजा सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विद्यापीठाकडून दोन विद्यार्थ्यांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. तीन महिन्‍यांपूर्वी वसतिगृहात गांजा आढळून आला होता. या सर्व प्रकारावरून विद्यापीठाच्‍या प्रशासन कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक पाचमधील एका खोलीत विद्यार्थी गांजा ओढत असल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने सुरक्षा विभागाकडे केली. त्यावर सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन घटनेची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार सुरक्षा विभागाने तक्रारदार विद्यार्थी व गांजा ओढत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. गांजा ओढताना आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे वसतिगृह देण्यात आलेले नाही, तरीसुद्धा संबंधित विद्यार्थी वसतिगृहात अनधिकृतपणे राहात असल्याचे विद्यार्थी संघटनेचे म्‍हणणे आहे.

दरम्‍यान, याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन विद्यार्थ्यांकडे गांजा आढळून आला असून, या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्‍यानंतर त्‍यांची सुटका करण्यात आली. यापूर्वीही विद्यार्थ्यांकडे गांजा सापडला होता. त्‍यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून खबरदारी घेणे अपेक्षित होते. मात्र, याबाबत विद्यापीठ प्रशासनच उदासीन असल्‍याची टीका विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.

विद्यापीठांत वारंवार गांजा सापडण्याच्या घटना घडत आहेत. या सर्व गैरप्रकारांना अकार्यक्षम प्रभारी कुलसचिव जबाबदार आहेत. कारण सुरक्षा विभाग आणि वसतिगृह विभाग हा कुलसचिवाच्या अंतर्गत येतो. म्हणून कुलसचिवाची तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे. याबाबत लवकरच तीव्र आंदोलन करणार आहोत, अशी माहिती विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राहुल ससाणे यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये