घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक- एकवीस संचालकपदांसाठी १८२ उमेदवारी अर्ज

शिरूर : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत एकूण २१ संचालकपदाच्या निवडीसाठी १८२ उमेदवारांनी अर्ज भरले.
शिरूर-हवेलीचे विद्यमान आमदार अशोक पवार अध्यक्ष असलेल्या या (न्हावरे ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दि. ३१ जुलै रोजी होत असून यासाठी दि. २४ ते ३० जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे.
या निवडणुकीसाठी ऊस उत्पादक सभासदांनी निवडून द्यावयाचे मांडवगण फराटा गट, इनामगाव गट, वडगाव रासाई गट या तीन गटांतून प्रत्येकी दोन, न्हावरे गट, तळेगाव ढमढेरे गट, शिरूर गट या तीन गटातून प्रत्येकी तीन तसेच उत्पादक/बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थांच्या प्रतिनिधींच्या गटातून एक, अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी गटातून एक, महिला राखीव प्रतिनिधी गटातून दोन, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी भटक्या-विमुक्त जाती/जमाती एक व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी एक अशा एकूण २१ जागी संचालक निवडून द्यावयाचे आहेत. या निवडणुकीसाठी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनल व माजी व्हा. चेअरमन दादापाटील फराटे यांच्या प्रमुख पॅनलमध्ये लढत होणार आहे.
ऊस उत्पादक सभासदांनी निवडून द्यावयाचे मांडवगण फराटा गटातून दोन जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज, इनामगाव गटातून दोन जागांसाठी १४, वडगाव रासाई गटातून दोन जागांसाठी २२, न्हावरे गटातून तीन जागांसाठी २०, तळेगाव ढमढेरे गटातून तीन जागांसाठी ३३, शिरूर गटातून तीन जागांसाठी २०, तसेच उत्पादक/बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थांच्या प्रतिनिधींच्या गटातून एका जागेसाठी ९, अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी गटातून एका जागेसाठी सहा उमेदवारी अर्ज व महिला राखीव प्रतिनिधी गटातून दोन जागांसाठी १८ उमेदवारी अर्ज, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी भटक्या-विमुक्त जाती/जमाती या एका जागेसाठी १२ व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधींच्या एका जागेसाठी १४ असे २१ जागांसाठी एकूण १८२ सभासदांनी संचालकपदासाठी अर्ज भरले असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शंकर कुंभार यांनी दिली.



