घोडगंगा साखर कारखाना ओरबाडून खासगी ‘भरणा’

संचालक अशोक पवार यांच्या दुष्कृत्यावर जळजळीत टीका
पुणे : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. या अनुषंगाने तालुक्यातील सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येवून घोडगंगा किसान क्रांती पॅनेलची स्थापना केली. यंदा ७ वी निवडणूक होत आहे. २०१५ साली झालेल्या मागील निवडणुकीमध्ये अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली पनेलला पूर्णच्या पूर्ण २१ जागा मिळाल्या होत्या. परंतु त्यांना एवढे मोठे बहुमत देवून देखील आज सभासदांना काय मिळाले, असा आरोप गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत घोडगंगा सहकारी साखर कारखाना पॅनेलचे ॲड. सुरेश पलांडे यांनी केला.
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येवून घोडगंगा किसान क्रांती पॅनेलची स्थापना केलेली आहे. घोडगंगा कारखान्याच्या दुरावस्थेला फक्त आणि फक्त चेअरमन अशोक पवार हे कारणीभूत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक कारभारासाठी घोडगंगा किसान क्रांती पॅनेलला विजयी करावे. ॲड. सुरेश पलांडे, किसान क्रांती पॅनेल
किसान क्रांती पॅनेलचे प्रमुख मुद्दे
भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक व लोकाभिमुख कारभार
उसाला किमान ३००० रुपये बाजारभाव देणार
राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने कारखाना कर्जमुक्त करणार
विस्तारवाढ, गाळप क्षमता वाढवून ऊसतोड वेळेवर करणार
कामगार, ऊसतोड मजूर, वाहतूकदारांचे पेमेंट वेळेत करणार
सहवीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणार
ऑनलाईन खरेदी-विक्री व ओपन टेंडर पद्धत राबवणार
मयत वारसांच्या नोंदी सुलभ करणार
सभासदांना साखर, ठेव पासबुक व इतर सोयी देणार
कारखान्याचा काय विकास झाला, याचा विचार होणे गरजेचे आहे. घोडगंगा कारखाना खासगी पद्धतीने चालविला जात आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. ३५ लाख टनांपेक्षा अधिक ऊस तालुक्यात होत आहे. भौगोलिकदृष्ट्या अत्यंत लाभदायी कार्यक्षेत्र असताना देखील मागील १२ वर्षांत कारखान्याची प्रगती होण्याऐवजी कारखाना अधोगतीला जाताना दिसत आहे.
२०१० साली कारखान्याने ८ लाख ६५ हजार टन ऊस गाळप केला होता. परंतु आता मागील ६ वर्षामध्ये हे गाळप सरासरी ५ लाख टनापर्यंत आले आहे. एका बाजूला कारखान्यावरील कर्ज व एकूण देणी सुमारे ४०० कोटींपर्यंत गेलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला सातत्याने सभासदांच्या उसाला कमी बाजारभाव मिळत आहे. मग नक्की पैसे जातात कुठे असा जळजळीत आरोप अॅड. पलांडे यांनी केला.
घोडगंगा साखर कारखान्याच्या वैभवशाली कारभाराला मातीत घालण्याचे काम अशोक पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे. टोळ्यांनी कापलेल्या उसापासून ते तिजोरीतल्या पैशापर्यंत घोडगंगा अक्षरशः लुटला आणि त्या सर्व पैशाचा विनियोग आपल्या खासगी कारखाना उभा करण्यासाठी केला, अशी सडकून टीका पत्रकार परिषदेत त्यांनी केली. घोडगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये मातब्बरा विरोधात लढाई सुरू असून पवार यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले.
घोडगंगाच्या खर्चाची तुलनात्मक आकडेवारी निहाय सादरीकरण यावेळी करण्यात आले. त्यामुळे घोडगंगा कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अपव्य होतो आणि भ्रष्टाचार होतो, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. वीज निर्मिती , बाजारभाव , गाळप क्षमता या सर्वच आघाड्यांवर घोडगंगाचे व्यवस्थापन संशयास्पद आहे.२०१९ मध्ये उत्पादन खर्चामध्ये १४८३ रुपयांची तफावत असून ही तफावत आमदारकीच्या निवडणुकीतील खर्चाचे प्रतिबिंब आहे काय, असा प्रश्न ॲड. पलांडे यांनी विचारला.
घोडगंगा कारखान्याचा प्रतिटन उत्पादन खर्च भीमाशंकर कारखान्याचा तुलनेत दुपटीपेक्षाही अधिक आहे. अशा प्रकारे खर्च केल्यावर कारखान्याची आणि सभासदांची वाताहत होत आहे. याचाच अर्थ असा होतो की, भीमाशंकर कारखान्याचा साखर उत्पादनाचा प्रति किलो साधारण ८ रूपये असून घोडगंगेचा प्रति किलो खर्च १८ रुपयांपेक्षाही अधिक का आहे, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. शेतकऱ्यांची आणि सभादांची दिशभुल अशोक पवार करत आहेत. त्यामुळे ६ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत नक्की सकारात्मक बदल घडावा, अशी अपेक्षा अॅड. पलांडे यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, कारखान्याला कर्जमुक्त करण्यासह ऊसाला तीन हजार रुपयांचा बाजारभाव देण्याबाबत आहोत. याशिवाय पारदर्शक, लाेकाभीमुख कारभारला पॅनेलचे प्राधान्य आहे. या पत्रकार परिषदेला घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात शेतकरी सभासद पुरस्कृत किसान क्रांती पॅनलच्या वतीने सुरेश पलांडे, उमेदवार आबासाहेब गव्हाणे, शिरुर तालुका भाजपचे आबासाहेब सोनवणे, काकासाहेब खळदकर, कैलास सोनवणे, संजय पलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.