प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चिपळूणमध्ये फ्लायओव्हरचा काही भाग कोसळला … स्फोटाच्या आवाजाने नागरिकांची पळापळ
Chiplun News :
मुंबई – गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळलाय. चिपळूणमधून (Chiplun) एक मोठी बातमी समोर आली आहे. बहादुरशेख नाका येथील फ्लायओव्हरला आधीच तडे गेले होते. त्यात आज सकाळी पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचं काम सुरु आहे. याआधी गर्डरमुळे महामार्गावर धोका निर्माण झाला होता. आता या पुलाचे बांधकाम सुरू असताना धोका निर्माण झालाय. काम सुरु असलेल्या पुलाच्या आतील सळ्या देखील दिसू लागल्यात.
पुलाचा काही भाग कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि पूल कोसळला तेव्हा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला असं तेथील काही नागरिकांनी म्हटलंय. घटनेनंतर स्थानीक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
https://www.instagram.com/reel/Cycz9IqBUDJ/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
यापूर्वी ऑगस्टमध्ये रत्नागिरीतील हा मुंबई-गोवा महामार्गावरील याच उड्डाण पुलाचा गर्डर लॉन्चर तुटला होता. महाकाय लॉन्चरचे काही भाग तुटल्याने मुंबई-गोवा (Mumbai-goa expresway ) महामार्गावरील वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला होता. यावेळी कोणतीही जीवीतहानी झाली नव्हती. मात्र, जास्तीच्या वजनामुळे गर्डर लॉन्चर खाली कोसळण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यावेळी या गर्डरचा कोणताही धोका नसल्याचा आणि पुलालाही कोणताच धोका नसल्याचं सांगितलं गेलं होतं. त्यानंतरही ही दुर्घटना घडली आहे