‘जवान’ चित्रपटाबाबत गिरीजा ओकचा मोठा खुलासा; म्हणाली, “माझ्याकडून या चित्रपटाच्या करारामध्ये लिहून घेतलं होतं की…”

मुंबई | Jawan – सध्या बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. तसंच या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. विशेष म्हणजे जवान चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकनं (Girija Oak) देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर एका मुलाखतीत गिरीजानं या चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे.
नुकतीच गिरीजा ओकनं सौमित्र पोटेच्या युट्युब चॅनेलवरील ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमामध्ये मुलाखत दिली. यावेळी तिनं या चित्रपटाबाबत गुप्तता का बाळगण्यात आली आणि त्या संदर्भात काय करार करण्यात आला याबाबतचा खुलासा केला. गिरीजानं सांगितलं की, “या चित्रपटाबाबत आम्हाला काहीही सांगण्याची परवानगी नव्हती. त्यासाठी आमच्यासोबत एक करार करण्यात आला होता. या करारामध्ये लिहून घेतलं होतं की आम्ही चित्रपटाबाबत कुठेही काहीही सांगायचं नाही. तसंच याची आम्हाला अधून मधून आठवण करून देण्यासाठी ते ईमेलही पाठवत होते.”
“या चित्रपटाबाबत एवढी गुप्तता बाळगण्याचं मुख्य कारण म्हणजे आजकाल पायरसीचं प्रमाण खूप वाढलं आहे. तसंच आमच्या सेटवरून शाहरूख खानचे काही फोटो लीक झाले होते. त्यामुळे एवढी गुप्तता बाळगण्यात आली होती. त्याचबरोबर गेली दोन वर्ष मी या चित्रपटाचं टप्प्याटप्प्यात शूटिंग करत होते. या चित्रपटात मी आत्तापर्यंत काही न केलेल्या गोष्टी करताना दिसणार आहे. त्यामुळे तुम्हाला माझा एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे.”