कसब्याचा आपला माणूस हरपला, राजकीय नेत्यांकडून हळहळ व्यक्त

पुणे | Girish Bapat Passed Away – पुण्याचे (Pune) खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचं आज (29 मार्च) निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. तसंच त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अशातच बापट यांची प्रकृती अचानक खालावल्यानं त्यांना दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तसंच बापट यांच्या पार्थिवावर संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
1973 पासून गिरीश बापट राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची (BJP) यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. त्यामुळे पुण्याची ताकद अशी त्यांची ओळख होती. तसंच आता त्यांच्या निधनानं भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
एक सच्चा लोकप्रतिनिधी गमावला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ही अतिशय दुख:द बातमी आहे. आपण सर्वांनी एक सच्चा, प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे. गिरीष बापट गेली अनेक वर्ष सक्रीय राजकारणात होते. त्यांची कारकीर्द नगसेवकापासून सुरू झाली. पुढे ते मंत्री आणि खासदारही झाले. मंत्रीमंडळात काम करताना आम्ही दोघं शेजारीच बसत होतो. त्यांच्या निधनानं भाजपची हानी झालीच, पण आपणही एक सच्चा लोकप्रतिनिधी गमावला आहे.
गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेतली : शरद पवार
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला.
मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले : सुप्रिया सुळे
माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले. त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.
साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं : चंद्रकांत पाटील
पुणे पोरकं झालं…! भाजप ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार आदरणीय गिरीशजी बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबतच आम्हा भाजपच्या परिवारावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. #RSS चे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे, आमचा मार्गदर्शक हरपला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली !!
महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिलं जायचं : अजित पवार
राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचं निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिलं जायचं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
पुण्यामध्ये भाजपच्या जडणघडणीतील एक प्रमुख व क्रियाशील नेतृत्व : नितीन गडकरी
गिरीशजी बापट यांच्या निधनाचं वृत्त ऐकून अतिशय दु:ख झालं. पुणे शहरात जनसंघाच्या काळापासून गेली पाच दशके सक्रिय राजकारणात असणारे, पूर्वीपासून विधिमंडळात व आता लोकसभेतील माझे जीवलग सहकारी, पुण्यामध्ये भाजपच्या जडणघडणीतील एक प्रमुख व क्रियाशील नेतृत्व होते, अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या आहेत.