धक्कादायक! कल्याणमध्ये आईसमोरच मुलीची हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कल्याण | Kalyan Crime – कल्याणमध्ये (Kalyan) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरूणानं 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची तिच्या आईसमोरच हत्या केली आहे. तरूणानं मुलीवर चाकून सात ते आठ वार केले, या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. कल्याणमधील तिसगाव परिसरात ही घटना घडली आहे.
आदित्य कांबळे असं आरोपी तरूणाचं नाव आहे. आरोपी आदित्य काल संध्याकाळपासून अल्पवयीन तरूणी राहते त्या आदित्य दुर्गा दर्शन सोसायटीच्या आवारात फिरत होता. त्यावेळी तो तेथील रहिवाशांना संबंधित मुलगी घरी कधी येते याची माहिती विचारत होता. तसंच बुधवारी रात्री अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत खासगी शिकवणी वर्गावरून घरी येत होती. त्यावेळी ती सोसायटीतील जिन्यातून जात असताना मागून येऊन आदित्यने तिच्या आईला ढकलून मुलीवर चाकूने सात ते आठ वार केले. मुलीच्या छातीवर घाव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तसंच आदित्य तेथून पळून जात असताना तेथील रहिवाशांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
तरूण मुलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी आदित्य फिनेल प्यायला होता. त्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, त्यानं मुलीची हत्या का केली? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, आरोपी आदित्यने मृत मुलीला दोन वेळा प्रेमासाठी गळ घातली होती. मात्र मुलीने त्याला नकार दिल्यामुळे त्याने तो राग मनात धरून हे कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.