मोदींच्या जयकाराला ‘गो बॅक’ने प्रत्युत्तर
पुणे | PM Narendra Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पुणे (Pune) दौऱ्यादरम्यान काळे झेंडे घेऊन विरोधकांकडून पुण्यातील मंडई परिसरात आंदोलन करण्यात आले. यामध्ये काँग्रेससह अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, रमेश बावगे, मोहन जोशी यांच्यासह काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते उपस्थित हाेते.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची प्रचंड तयारी आणि उत्साह दिसून येत असताना दुसरीकडे पुण्यातील श्रमिक वर्गासह प्रमुख पक्ष रस्त्यावर उतरले होते. मोदींच्या नावाचा गजर चालू असताना दुसरीकडे ‘गो बॅक’ मोदीचे फलकही झळकले.
‘मन की बात नही मणिपूर की बात करे’…. अशा आशयाची आरोळी विरोधकांनी ठोकली. इतकेच नव्हे तर या विरोधकांच्या आंदोलनामध्ये सर्वसामान्य पुणेकरदेखील उतरले असल्याचे दिसून आले.
मणिपूरवरून एकूणच मोदी आणि भाजपची प्रतिमा डागाळत असल्याची प्रचिती पुन्हा एकदा यानिमित्ताने आली. राष्ट्रवादी, काँग्रेस, मणिपूर निवासी नागरिक, तसेच श्रमिक दल, बाबा आढाव यांची हमाल पंचायत अशा अनेक घटकांनी रस्त्यावर उतरून मोदी यांच्या दौऱ्याचा विरोध केला. मोदी यांनी प्रथम मणिपूरचा हिंसाचार थांबवावा, स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी या वर्गाची मागणी होती. अनेक ठिकाणी मोदी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.आ. रवींद्र धंगेकर, प्रशांत जगताप, अंकुश काकडे आदींनी याबाबत पुढाकार घेतला.