कोल्हापुरात गोवा-मुंबई खासगी बस उलटली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
कोल्हापूर | Kolhapur Accident : कोल्हापूरमधील (Kolhapur) पुईखडी येथे भीषण अपघात (Accident) झाला आहे. एक खासगी ट्रॅव्हस उलटल्याने हा अपघात घडला आहे. ही बस गोव्यावरून मुंबईला जात होती त्यावेळी कोल्हापूरमधील पुईखडी येथे ती उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी रात्री आठच्या दरम्यान ही बस गोव्यावरून निघाली होती. या बसमध्ये 25 प्रवासी प्रवास करत होते. तर मध्यरात्री दोन वाजता ही बस कोल्हापूरच्या पुईखडी येथे वळण घेत असताना उलटली. या भीषण अपघातात पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातानंतर तातडीनं अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. तर या अपघातादरम्यान चार प्रवासी बसखाली अडकले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. तसंच या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.