मुंबईच्या अंबानी हॉस्पिटल मध्ये ‘कृष्णा’ मेडिकलचा दबदबा
Mumbai | आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार सेवा देणाऱ्या मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये आता कराडच्या कृष्णा मेडिकलचा दबदबा वाढला आहे. कृष्णा मेडिकल फाउंडेशन अंतर्गत येणाऱ्या नर्सिंग कॉलेजमध्ये तब्बल साठ विद्यार्थ्यांची अंबानी हॉस्पिटलमध्ये निवड झाली असून कृष्णाच्या शिस्तप्रिय दर्जेदार आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे या निमित्ताने कौतुक होत आहे.
मुंबईतील कोकिलाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा नर्सिंग इन्स्टीट्यूटमधील 60 विद्यार्थीनींना नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. नुकतंच कृष्णा नर्सिंग इन्सिट्यूटमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू झाले, या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना नोकरीची संधी प्राप्त झाली आहे.
कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी कोकिलाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटलच्या सरव्यवस्थापक हवोवी फौजदार, मनुष्यबळ अधिकारी अनोरा बाप्टिस्टा हे उपस्थित होते. यावेळी कृष्णा नर्सिंग इन्स्टीट्यूटच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते यांनी त्यांचे स्वागत केले. तर या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये 66 विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची स्टाफ नर्ससाठी मुलाखत घेण्यात आली. यामध्ये 60 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना ऑफर लेटर देण्यात आले आहे.