मुंबई : आज विधानसभेत अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर १६४ मतांनी विजयी झाले. त्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आपली जबाबदारी चांगल्यारितीने पार पडल्यामुळे त्याचं अभिनंदन आणि कौतुक करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकर यांनी बोचरी टीका केली आहे.
नरहरी झिरवळ याचं कौतुक करताना जयंत पाटील यांनी “आदिवासी असून देखील नरहरी झिरवळ यांनी चांगली कामगिरी केली” असं विधान केलं. त्यानंतर जातीचा उल्लेख केल्यामुळे त्यांनी माफी देखील मागितली. मात्र याच मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. “जयंत पाटीलांची सत्ता गेली तरी माज अजून गेलेला नाही, हा माजोरडेपणा अनेक वर्षांपासून आहे. जयंत पाटील यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याबाबत बोलताना ‘आदिवासी असून देखील नरहरी झिरवळ यांनी चांगली कामगिरी केली’ असं वक्तव्य केलं. आदिवासी समाजातून येऊन म्हणजे काय? असा सवाल पडळकर यांनी केला.’ एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
तुमच्या डोक्यातला जातीयवाद अजून जायला तयार नाही. तुमच्या जे पोटात आहे ते ओठावर येतंय. इथले मागासवर्गीय, आदिवासी भटक्या जमाती, विमुक्त जातीतील लोक काही करू शकत नाहीत का? त्यांना अनेकवेळा वेगवेगळ्या पद्धतीने जातीवादामध्ये अडकावण्याचे प्रयत्न राज्यातील प्रस्थापितांनी नेहमीच केले आहेत. जयंत पाटलांनी आज सभाग्रहात बोललेला हा त्याचाच भाग आहे.